कोल्हापूरच्या दसरा चौकात एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन; निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिकांचे आवाहन
निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या सत्तर वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असून, सीमा भागातील मराठी भाषिकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आता निर्णायक जनसंघर्ष उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत सीमा भागातील मराठी भाषिकांना ‘चलो कोल्हापूर’चे आवाहन करण्यात आले आहे.
सीमा प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी भाषिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सीमा भागातील मराठी भाषिक गेल्या अनेक दशकांपासून आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने आणि निर्धाराने सीमा लढ्यात सहभागी होऊन निर्णायक जनआंदोलन उभारणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथील धरणे आंदोलन हा त्याच संघर्षाचा एक भाग असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या आंदोलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी जयराम मिरजकर होते. बैठकीला प्रा. अच्युत माने, विजयराव देसाई निपाणकर सरकार, रमेश निकम, नवनाथ चव्हाण, उदय शिंदे, प्रकाश रावण, लक्ष्मीकांत पाटील, कबीर वराळे, तुकाराम कोळी, अमोल शेळके, अमर विटे आणि एस. के. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निपाणीतून सकाळी ८.३० वाजता प्रस्थान
शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता निपाणी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात सर्वांनी एकत्र जमायचे असून, तेथून कोल्हापूरकडे रवाना होण्यात येणार आहे.
या धरणे आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मराठी भाषिकांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी क्रमांक :
- जयराम मिरजकर – ९३४१४१०६९९
- बाबासाहेब खांबे – ९३४२६२९६०१
- उदय शिंदे – ८९०४४४०८८६
- नवनाथ चव्हाण – ९५१३७७३७७७
- अमोल शेळके, यरनाळ – ८८९२५७३७८८
- लक्ष्मीकांत पाटील, भिवशी – ९६११७६१०१०
- के. डी. पाटील, कुर्ली – ९५३८४२१०७०
- गणेश माळी, मत्तीवडे – ७०१९८२४०४७
- अमर विटे, कोगनोळी – ९१९९२२८७९६
सीमा प्रश्नाच्या न्याय्य लढ्याला बळ देण्यासाठी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने कोल्हापूर येथील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
