ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक; तिघांकडून ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक; तिघांकडून ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

मार्क्स इनफ्रा कंपनीच्या नावाने ५ कोटींच्या व्यवहाराचे आमिष; बनावट नोटा व पिस्तूलही पोलिसांनी केले जप्त

बेळगाव : ऑनलाइन आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

७ नोव्हेंबर २०२६ रोजी सीसीबी विभागाचे पीएसआय मंजुनाथ भजंत्री यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली सीसीबी पथकाने अशोक मरेप्पा तवनाचे यांच्या घराच्या तळमजल्यावरील एका खोलीवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान शिवलिंगय्या राचय्या गणाचारी (वय २८, रा. मुगळखोड, ता. रायबाग), सागर लक्ष्मण किल्लीकेत (वय ३२, रा. कृष्णानगर, अंकली, ता. चिकोडी) आणि विनायक गणपती नोकरे (वय २७, रा. वडगोळ, ता. चिकोडी) यांना ताब्यात घेण्यात आले.

संशयित आरोपींनी मार्क्स इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून पाच कोटी रुपयांचे ऑनलाइन ट्रान्सफर करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी व्हाइट मनीच्या बदल्यात ब्लॅक मनी स्वरूपात तीन कोटी रुपये रोख मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले होते. ऑनलाइन ट्रान्सफरचा बनावट संदेश दाखवून चौथ्या आरोपीच्या माध्यमातून रोख रक्कम मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

या प्रकरणातील चौथा आरोपी शिवानंद कल्लाप्पा मुनवळ्ळी (वय २९, रा. चंद्रगी, ता. रामदुर्ग) याने चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया असे छापलेली खेळण्यातील नोटांची बंडले खऱ्या नोटांप्रमाणे दाखवून संबंधितांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्वांनी संगनमताने एकमेकांच्या मदतीने फसवणुकीचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून ५०० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या १० बनावट नोटा (एकूण ५ हजार रुपये), एक एअर पिस्तूल, विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) आणि एक बनावट बँक स्टेटमेंट असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ६२, ३१६(२), ३१८(४), ३३६(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त तसेच बेळगाव शहराचे डीसीपी यांनी सीसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − 2 =

error: Content is protected !!