विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ; विद्यार्थ्यांच्या प्रयोगांचे मान्यवरांकडून कौतुक
बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये ३ नोव्हेंबर २०२६ रोजी विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षक समन्वयक सविता पवार उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता विकसित करणे हा या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थिनी आराध्या अष्टेकर हिच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सविता पवार म्हणाल्या की, प्रयोगासाठी योग्य विषयाची निवड करण्यापासूनच संशोधन प्रक्रियेची सुरुवात होते. त्यामुळे विविध प्रयोग सादर करणारे सर्व विद्यार्थी हे बालवैज्ञानिकच आहेत. प्रयोगांमधील सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करते.
या प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, विज्ञान विषय प्रमुख रुपाली हळदणकर आणि अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विज्ञान विषय शिक्षिका मंजुषा पाटील, स्नेहल पोटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी जिया कांबळे हिने केले, तर अटल लॅब असिस्टंट स्नेहा कुप्पेकर यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, प्रयोगशीलतेला आणि वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन उत्साहात पार पडले.
