खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती लढवणार जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका

खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती लढवणार जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका

सर्व जागा लढविण्याचा एकमुखी ठराव; १ नोव्हेंबरचा काळा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन

खानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांमधील सर्व जागा लढविण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांत जनजागृती करून निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सीमाप्रश्न, आगामी निवडणुका, १ नोव्हेंबरचा काळा दिन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

१ नोव्हेंबरचा काळा दिन गांभीर्याने पाळणार

१ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. राजा शिवस्मारक भवनातील माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हाताला काळ्या फिती बांधून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले.

बेळगाव कर्नाटकचे असल्याच्या ठरावाचा निषेध

बेळगाव महानगरपालिकेत बेळगाव कर्नाटकचाच भाग असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत राष्ट्रीय पक्षांच्या नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. या ठरावाला विरोध करून सभात्याग करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर आणि नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या भूमिकेचे अभिनंदन करणारा ठरावही संमत करण्यात आला.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निषेधाचा ठराव

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या (SIR) माध्यमातून १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होत असल्याची भूमिका मांडत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधाचा आणि त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीचा ठराव संमत करण्यात आला.

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वक्तव्याचा निषेध

खानापूरचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी राज्योत्सवाच्या तयारीसंदर्भात समाजमाध्यमांवर केलेल्या वक्तव्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. राज्योत्सव हा खानापूर तालुक्याची संस्कृती आणि मानबिंदू वाढवणारा उत्सव असल्याच्या त्यांच्या विधानामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याची भूमिका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये देण्याची मागणी

केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दराचा हप्ता जाहीर करून न्याय द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच खानापूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खराब झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या संदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले असून, वेळेत रस्त्यांचे पुनर्निर्माण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुणे विभाग समिती व युवा समितीच्या कार्याचे कौतुक

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुणे विभागाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचे तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बिदर, भालकी, औराद आणि संतपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेचे बैठकीत कौतुक करण्यात आले.

समितीच्या मूळ प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन

सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी समितीपासून दूर गेलेल्या किंवा तटस्थ राहिलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मूळ प्रवाहात सहभागी व्हावे. संघटना अधिक बळकट करून सीमाप्रश्न सुटेपर्यंत एकजूट कायम ठेवावी आणि प्रत्येक लढ्यात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, मध्यवर्ती समितीचे सदस्य राजाराम देसाई, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, वसंत नवलकर, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी संजीव पाटील, रवींद्र शिंदे, बाबुराव पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, मोहन गुरव, आप्पाराव मुतकेकर, ज्योतिबा खाडे, देवाप्पा भोसले, किरण पाटील, कृष्णा मनोळकर, मरू पाटील, गजानन बेळगावकर, नाना घाडी, विठ्ठल गुरव, शंकर गुरव आदी समितीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + fifteen =

error: Content is protected !!