रामराव राठोड यांची युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सांत्वनपर भेट
बिदर | बेधडक बेळगाव वृत्तसेवा
महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर विभागाचे अध्यक्ष ज्येष्ठ सीमासैनिक रामराव राठोड यांच्या पत्नी कै. राजाबाई रामराव राठोड यांचे २१ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी शिळवणी (बिदर) येथे राठोड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
भालकी-बिदर दौऱ्यावर असताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी रामराव राठोड यांची भेट घेतली. यावेळी कै. राजाबाई राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
स्वतः पत्नीच्या निधनाच्या दुःखातून जात असतानाही युवा समितीचे पदाधिकारी भेटीस येणार असल्याचे समजताच रामराव राठोड यांनी अत्यंत आपुलकीने त्यांची वाट पाहिली. वयाची नव्वदी पार केलेल्या राठोड यांना वयोमानामुळे ऐकणे-बोलणे काहीसे कठीण झाले असले, तरी युवा समितीचे पदाधिकारी घरी पोहोचल्यापासून निरोप घेईपर्यंत त्यांच्या प्रत्येक शब्दातून सीमालढ्याविषयीची तळमळ आणि महाराष्ट्रात जाण्याची जिद्द प्रकर्षाने जाणवत होती.
स्वतःच्या दुःखापेक्षाही सीमाप्रश्नाची चिंता त्यांच्या मनात अधिक असल्याचे पाहून उपस्थित युवा पदाधिकाऱ्यांचे मन हेलावून गेले. गेल्या अनेक दशकांच्या सीमालढ्याचा इतिहास, कागदपत्रे आणि विविध दस्तऐवज त्यांनी आजही जपून ठेवले आहेत. संपूर्ण आयुष्य सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी समर्पित करणाऱ्या राठोड यांच्या कुटुंबानेही या लढ्यात सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक पिढीने सीमाप्रश्नाशी असलेली बांधिलकी कायम जपली आहे.
रामराव राठोड यांची ही तळमळ पाहून युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ सीमासैनिकांनी केलेला त्याग आणि संघर्षाची पुन्हा एकदा जाणीव झाली. ज्यांनी आयुष्यभर सीमाप्रश्नासाठी संघर्ष केला, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या पिढीने अधिक ताकदीने पुढे नेली पाहिजे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कै. राजाबाई रामराव राठोड यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि रामराव राठोड यांच्या डोळ्यांदेखत संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊन सीमाप्रश्न कायमचा सुटावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, सचिन दळवी, रंजित हावळण्णाचे, रमेश माळवी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विनायक हुलजी, श्रीकांत नांदुरकर, वकील वैभव कुट्रे, तसेच हरीबसू धुळजी, विनायक पवार, राजू पाटील, निलेश काकतकर, सूरज जाधव, उमेश पाटील, परीणय कदम, विद्येश बडस्कर, ओमकार बैलुरकर, ज्ञानेश चिकुर्डे, गोविंद कुडेंकर, यल्लाप्पा पाटील, चेतन खोटे, अमोल चौगुले, विनायक कांगले, यश कदम, प्रणव घगवे आदी उपस्थित होते.
