बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
घटस्फोटाची मागणी केल्याच्या रागातून पतीने पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बैलहोंगल तालुक्यातील अमटूर गावात घडली आहे. लक्ष्मी माडमगेरी (वय ३१, रा. गोळ्ळर गल्ली, बैलहोंगल) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, राजू माडमगेरी असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, बैलहोंगल पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे पाच वर्षांपूर्वी लक्ष्मी आणि राजू यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून मतभेद निर्माण झाले होते. या सततच्या वादामुळे लक्ष्मीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली होती. याच कारणावरून राजू संतप्त झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.
पत्नीच्या घटस्फोटाच्या मागणीमुळे संतापलेल्या राजूने तिच्या हत्येचा कट रचल्याचे सांगण्यात येत आहे. लक्ष्मी कामावरून परतत असताना तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून राजूने निर्जन ठिकाणी नेले. तेथे तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे अमटूर गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी राजू माडमगेरी फरार झाला असून, त्याला अटक करण्यासाठी बैलहोंगल पोलीस ठाण्याचे पथक शोधमोहीम राबवत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
