विसर्जनासाठी दोन दिवसांत सुविधा पूर्ण करा : आयुक्त

विसर्जनासाठी दोन दिवसांत सुविधा पूर्ण करा : आयुक्त

क्रेन, मंडप, सुरक्षा आणि इतर आवश्यक व्यवस्थांची पूर्तता करण्याच्या सूचना

बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जनाची प्रक्रिया सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी कपिलेश्वर येथील जुन्या व नवीन विसर्जन तलावांवर आवश्यक सुविधा दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त एम. कार्तिक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आयुक्त कार्तिक यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही विसर्जन तलावांची पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षितता, भाविकांची ये-जा आणि विसर्जनाची प्रक्रिया याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिकेच्या माध्यमातून तलाव परिसरात क्रेन, पाणी, प्रकाशयोजना, मंडप आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख विसर्जन तलावांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

विसर्जनाच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी विविध ठिकाणी क्रेन, जेसीबी आणि जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. दोन दिवसांनंतर पुन्हा पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

धोकादायक इमारत विसर्जन काळात बंद

कपिलेश्वर येथील जुन्या विसर्जन तलावाजवळ असलेल्या धोकादायक इमारतीचा वापर विसर्जन काळात पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विसर्जनाच्या काळात कोणत्याही भाविकाने या धोकादायक इमारतीच्या परिसरात जाऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे.

यावेळी शहर अभियंता लक्ष्मी निपाणीकर, विकास कलघटगी, नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, मंगेश पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 20 =

error: Content is protected !!