सरफोजीराजे भोसले (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनात बेळगावच्या साहित्यिकांचा सहभाग
बेळगाव : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा दक्षिण भारतात जपणाऱ्या ऐतिहासिक तंजावर नगरीत दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले (द्वितीय) मराठी साहित्य संमेलनासाठी बेळगावचा साहित्यिक चमू उत्साहात तंजावरकडे रवाना झाला.
डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, तंजावर हे आहेत. तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत मराठी साहित्याचा जागर घडविणाऱ्या या संमेलनात बेळगावमधील साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींचा सहभाग राहणार आहे.
बेळगावच्या साहित्यिकांचा विशेष सहभाग
संमेलनासाठी सीमाकवी रवींद्र पाटील आणि आप्पासाहेब गुरव यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच ॲड. सुधीर चव्हाण यांच्यासह बेळगावच्या विविध क्षेत्रांतील साहित्यिक आणि साहित्यप्रेमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बेळगावच्या साहित्यिक चमूमधील कवी व्यं. कृ. पाटील, कवी रामदास बिर्जे आणि शिवसंत संजय मोरे यांना कविसंमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या साहित्यिक चमूमध्ये विलास पवार, उद्योजक टोपाणा पाटील, संजय गुरव, ॲड. एन. डी. पाटील, ॲड. महेश कदम, प्रा. रमेश भोसले, लेखक नितीन आनंदाचे, नारायण कणबरकर, मोहन पाटील सर, सुभेदार के. आर. मोटर, शिवाजी खांडेकर, सयाजीराव सावंत, शशिकांत अष्टेकर, कृष्णा गवंडी, मोहन मन्नोळकर, रघुनाथ पाटील, तानाजी पाटील, रामलिंग देसाई, मारुती पाटील, दिलीप चव्हाण, मनोहर संताजी आदींचा समावेश आहे.
मराठी वारशाशी नाते दृढ करणारा सांस्कृतिक प्रवास
बेळगाव ते तंजावर हा प्रवास केवळ साहित्य संमेलनापुरता मर्यादित नसून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि तंजावरच्या मराठी ऐतिहासिक वारशाशी नाते दृढ करणारा सांस्कृतिक प्रवास असल्याचे साहित्यिकांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची आणि भोसले घराण्याच्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणाऱ्या तंजावरच्या भूमीत मराठी साहित्याचा जागर घडणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या साहित्यिक चमूच्या सहभागाकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.
“तंजावर संमेलनासाठी निघाले मावळे… तंजावर संमेलनात होणार बेळगावचा सन्मान आणि साहित्यिकांच्या कार्याचा गौरव!” अशा उत्साहपूर्ण वातावरणात बेळगावचा साहित्यिक चमू तंजावरकडे रवाना झाला. दि. २३ सप्टेंबर रोजी होणारे हे साहित्य संमेलन मराठी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
