तंजावरच्या साहित्य संमेलनात ‘बेळगावचा झेंडा’

तंजावरच्या साहित्य संमेलनात ‘बेळगावचा झेंडा’

सीमाभागातील मान्यवरांना साहित्यपीठावर विशेष स्थान

बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज घुमणार आहे. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात सीमाभागातील मान्यवर साहित्यिक, कवी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींना विशेष स्थान मिळणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील तसेच बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची उपस्थिती या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

संमेलनातील ग्रंथदिंडीच्या शुभारंभप्रसंगी अ.भा.म.सा. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून तंजावरच्या भूमीत मराठी ग्रंथपरंपरा आणि साहित्यसंस्कृतीचा जागर करण्यात येणार आहे.

यावेळी तंजावरचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांचा बेळगाव सीमाबांधवांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

विचारपीठावर रवींद्र पाटील

संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अ.भा.म.सा. परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील हे संमेलनातील विविध विचारपीठांवर सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी सुरू असलेल्या साहित्यिक वाटचालीचे प्रतिनिधित्व त्यांच्या सहभागातून तंजावरच्या व्यासपीठावर होणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद गोरे, उद्घाटक श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि निमंत्रक श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साहित्यिक सोहळा संपन्न होणार आहे.

मराठी साहित्य परंपरेचा ऐतिहासिक संगम

तंजावर ही श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले यांच्या मराठीप्रेमाची ऐतिहासिक भूमी आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेशी जोडलेल्या या भूमीत सीमाभागातील साहित्यिकांना मिळणारे व्यासपीठ हे बेळगावच्या मराठी साहित्यविश्वासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

एकीकडे सरफोजीराजांची समृद्ध मराठी परंपरा, तर दुसरीकडे सीमाभागातून मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेली साहित्यिक वाटचाल, या दोन प्रवाहांचा ऐतिहासिक संगम तंजावरच्या भूमीत अनुभवायला मिळणार आहे.

सीमाभागातील मान्यवरांना तंजावरच्या साहित्यपीठावर मिळणारे हे विशेष स्थान आणि त्यांचा सहभाग यामुळे संमेलनाकडे बेळगावमधील साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + three =

error: Content is protected !!