बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेत जागृती मंचतर्फे ‘आरोग्य भान – किशोरावस्था : वाढ व विकासाचा टप्पा’ या विषयावर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
दि. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात शाळेची माजी विद्यार्थिनी तसेच शेख होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कीर्ती अभय बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वयानुसार होणारी शारीरिक वाढ, मासिक ऋतुचक्र तसेच किशोरावस्थेतील बदलांचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार कसा करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
किशोरावस्था हा साधारणपणे १० ते १९ वर्षांचा काळ असून बालपणातून प्रौढत्वाकडे जाणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात हार्मोनल बदलांमुळे उंची, वजन आणि शारीरिक रचनेत झपाट्याने बदल होतात. त्याचबरोबर मानसिक पातळीवर भावनिक चढ-उतार, चिडचिड तसेच स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची भावना वाढीस लागते. या वयात मित्र-मैत्रिणींच्या संगतीला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता असल्याने किशोरावस्था हा अनेकदा ‘वादळ आणि संघर्षाचा काळ’ मानला जातो. या सर्व बाबी डॉ. कीर्ती बिर्जे यांनी पीपीटीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका तथा जागृती मंच प्रमुख नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शेती प्रमुख अरुण बाळेकुंद्री, शिक्षक गजानन सावंत, स्नेहल पोटे तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी तन्मयी पावले हिने आभार मानले.
