निपाणी : प्रतिनिधी
सार्वजनिक गणपती आगमन तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी निपाणी परिसरातील सर्व दारू दुकाने, बार आणि बिअर शॉपी बंद ठेवण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भातील निवेदन मा. सीपीआय, निपाणी यांच्याकडे सादर करण्यात आले असून, त्याची प्रत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, बेळगाव जिल्हाधिकारी तसेच कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील काही वर्षांपूर्वी गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यातील CL-2, CL-9 आणि FL-BR-2 प्रकारातील दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात येत होता. त्यामुळे गणेश मिरवणुका शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडत होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचा आदेश काढला जात नसल्याने काही ठिकाणी दारूच्या नशेत मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या तरुणांकडून गोंधळ, भांडणे तसेच अश्लील वर्तनाच्या घटना घडत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, गणेशोत्सवासारख्या श्रद्धेच्या उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
येत्या सार्वजनिक गणपती आगमनाच्या दिवशी तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरगुती व सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान बेळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने, बार आणि बिअर शॉपी बंद ठेवण्याचा ‘ड्राय डे’ आदेश काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दारू पिऊन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोरेश्वर थोरवत, संतोष कुर्ले, योगेश पोतदार, शेखर पकाले आणि योगेश कांबळे उपस्थित होते.
गणेशोत्सव हा उत्तर कर्नाटकातील अत्यंत मोठा आणि श्रद्धेचा सण असल्याने प्रशासनाने जनतेच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
