बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाला जी शास्त्री यांनी केले.
अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट १३१च्या वतीने हिरेबागेवाडी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील डोंगर परिसरात वृक्षारोपण प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमात अलायन्स क्लब ऑफ वेणुग्राम आणि अलायन्स ग्रुप ऑफ जी. जी. चिटणीस यांचा मोलाचा सहभाग होता. प्रकल्पाअंतर्गत काजू आणि आंब्याच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत एकूण ७०० रोपट्यांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात २२० रोपट्यांची यशस्वी लागवड करण्यात आली. वर्षभर सेंद्रिय खतांचा वापर करून तसेच नियमित पाणी देत या रोपट्यांचे संगोपन केले जाणार असून त्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती मदन बामणे यांनी दिली.
या कार्यक्रमास अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाला जी शास्त्री, डिस्ट्रिक्ट १३१च्या माजी प्रांतपाल व आंतरराष्ट्रीय संचालिका डॉ. नवीना शेट्टीगार, अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या अध्यक्षा राजश्री हसबे तसेच उपप्रांतपाल रमेश हेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शास्त्री म्हणाले की, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. केवळ रोपटी लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करून ती वृक्षरूपाने वाढविण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात श्री अम्मा भगवान सेवा समितीच्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपण मोहिमेसाठी मदन बामणे, आर. एम. चौगुले, डॉ. सविता देगीनाळ, डॉ. नवीना शेट्टीगार, मानसी चौगुले, भाग्यश्री कालकुंद्रीकर आणि ॲड. दिनकर शेट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सुधाकर चौगुले, नितीन कदम, पुरुषोत्तम हसबे, राम गुरव, दीपा आजरेकर, मधुरा गुरव, दीपा सांबरेकर, आनंद गोकावी, महेश चौगुले, रेखा बामणे, विद्या सरनोबत, दिपाली देसाई, प्रीती चौगुले, प्रदीप गट्टी आणि मल्लवा गोकावी आदी उपस्थित होते.
