शिनोळी बु. येथे गणेशमूर्तींना अंतिम रंगकामाची लगबग

शिनोळी बु. येथे गणेशमूर्तींना अंतिम रंगकामाची लगबग

शिनोळी बु. : गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शिनोळी बु. येथील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कार्यशाळांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावातील मूर्तिकार गणरायाच्या मूर्तींना अंतिम रंगसजावट करण्यात व्यस्त असून बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

मूर्तिकार मनोहर जोतिबा सुतार यांच्यासह घरातील महिला सदस्य गणेशमूर्तींना आकर्षक रंग देण्याचे काम करत आहेत. त्याचप्रमाणे बाबाजी जोतिबा सुतार आणि रमेश मल्लाप्पा सुतार यांच्या कार्यशाळेतही विविध आकारांच्या गणेशमूर्तींवर अंतिम रंगकाम सुरू असून प्रत्येक मूर्तीला देखणे रूप देण्यासाठी कारागीर मेहनत घेत आहेत.

माती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून साकारलेल्या गणेशमूर्तींना रंगांच्या माध्यमातून जिवंतपणा प्राप्त होत असून कलाकारांची कल्पकता, मेहनत आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम या मूर्तींमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार एकाच सुतार परिवारातील असून अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा त्यांनी जपली आहे.

यंदाही आकर्षक व सुबक गणेशमूर्तींमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार, दि. १४ रोजी होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी शिनोळी नगरी सज्ज झाली असून सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

छायाचित्र : शिनोळी बु. येथे गणेशमूर्तींना अंतिम रंगकाम करताना मूर्तिकार व महिला सदस्य.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × five =

error: Content is protected !!