जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त यंदाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी जेन्ट्स भवन येथे उत्साहात पार पडला.

यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये प्रा. डॉ. महेशकुमार एन., डॉ. विष्णू कंग्राळकर, सौ. अंजली अनंत नाडगौडा, लक्ष्मेश भट आणि चंद्रकांत रामचंद्र पाटील यांचा समावेश होता.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या गणित विभागातील प्राध्यापक प्रा. डॉ. महेशकुमार एन. हे गणित विषयातील तज्ज्ञ असून आयकर विषयाचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. ते प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिकांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. गणितासारखा कठीण विषय सोप्या व आकर्षक पद्धतीने शिकवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या २९ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन संशोधनपर लेख सादर केले आहेत.

डॉ. विष्णू कंग्राळकर हे मराठा मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या दोन संशोधनांना पेटंट मिळाले असून ३८ संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसेच ३७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदविला आहे.

सौ. अंजली अनंत नाडगौडा या जीएसएस कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. विज्ञान विषयाच्या अध्यापनासोबतच साहित्यप्रेमातून त्यांनी मराठी विषयात राणी चन्नम्मा विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देत त्यांना शैक्षणिक व वैयक्तिक पातळीवर मदत करण्याचे कार्य त्या सातत्याने करतात.

लक्ष्मेश भट हे सरकारी हायर प्रायमरी मराठी शाळा, कोणेवाडी येथे कन्नड विषयाचे शिक्षक आहेत. २४ वर्षांच्या सेवेत त्यांनी मराठी विद्यार्थ्यांना प्रेमाने कन्नड भाषा शिकविण्याबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते सदैव प्रयत्नशील असतात.

चंद्रकांत रामचंद्र पाटील हे संत मीरा स्कूलमध्ये गेली ३० वर्षे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक गुणवंत खेळाडू घडविले असून त्यांपैकी काहींनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. क्रीडा, व्यायाम आणि योगाचा प्रसार करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 17 =

error: Content is protected !!