बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेला ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनंत लाड उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील आणि विजय वाईगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे अनंत लाड यांनी मार्गदर्शन करताना आनंदी आणि निरोगी जीवनासाठी मानसिक व भावनिक स्वास्थ्याबरोबरच शारीरिक आरोग्य चांगले राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यात्मामुळे मन शुद्ध होते तसेच जीवनात ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण होते. त्यामुळे व्यक्ती मनाने आणि शरीराने तंदुरुस्त राहते, असे त्यांनी नमूद केले. वयाच्या साठीनंतर विचारसरणीत सकारात्मक बदल करून विविध छंद जोपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विजय वाईगडे यांनी प्रार्थनेने केली. यानंतर नारायण कोरडे, रविंद्रनाथ जुवळी, स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, विजय बांदिवडेकर, सतीश देशपांडे, एम. एस. हुद्दार, स्वाती माने, अरविंद मुतगेकर आणि सोनी सरोदे यांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच भरत गावडे यांनी कवितावाचन करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमात शिवराज पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली, तर के. एल. मजूकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्ञानवर्धक मार्गदर्शन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
