आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; जमीन विक्रीच्या वादातून दोन मुलांवर गुन्हा

आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण; जमीन विक्रीच्या वादातून दोन मुलांवर गुन्हा

इंदापूर : आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या विक्रीवरून झालेल्या वादातून वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी दोन सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तरंगवाडी परिसरात घडली. तुकाराम किसन राऊत (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी अंजना हे सरस्वतीनगर येथे राहतात. त्यांचे मुलगे संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत हे मालवाडी क्रमांक २ येथे स्वतंत्रपणे कुटुंबासह राहतात.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुकाराम आणि अंजना हे सलीम लॉन्सजवळील डांबरी रस्त्यावरून जात असताना दोन्ही मुलांनी टाटा नेक्सॉन कारमधून येत त्यांना अडवले. आईच्या नावावर असलेल्या जमिनीची विक्री का केली, असा सवाल करत त्यांनी व्यवहार रद्द करण्याची मागणी केली. यावेळी वाद वाढत जाऊन शिवीगाळ करण्यात आली.

त्यानंतर दोन्ही भावांनी कथितरित्या लाकडी दांडक्याने आई-वडिलांना मारहाण केली. तसेच जमीन व्यवहाराचा प्रश्न मार्गी न लावल्यास आणखी मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेचा गोंधळ पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या मारहाणीत तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर, दोन्ही मांडीवर आणि डाव्या खांद्यावर, तर अंजना राऊत यांच्या उजव्या मनगटाजवळ आणि कमरेला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =

error: Content is protected !!