बेळगाव : टिळकवाडी येथील महर्षी-महात्मा गांधी रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ संकष्ट चतुर्थीच्या शुभदिनी सिद्धिविनायक देवस्थान मंदिर परिसरात रोवण्यात आली. देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण गिंडे यांच्या शुभहस्ते सायंकाळी ८ वाजता मुहूर्तमेढ करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१९८८ साली स्थापन झालेल्या या मंडळाने सुरुवातीपासूनच केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता विधायक आणि सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. टिळकवाडी परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वर्षागणिक वाढत असताना उत्सवाच्या माध्यमातून समाजाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा आदर्श या मंडळाने जपला आहे.
विशेष म्हणजे, १९९६ सालापासून मंडळाने घरोघरी जाऊन वर्गणी अथवा देणगी गोळा न करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. उत्सवासाठी नागरिकांकडे वर्गणी मागण्यासाठी घरोघरी जाण्याची पद्धत बंद करून सामाजिक सलोखा आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना समाजावर आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा भार पडू नये, असा मंडळाचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.
तसेच, महर्षी-महात्मा गांधी रोडसारख्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर गणेशोत्सव न साजरा करता सिद्धिविनायक देवस्थान मंदिर परिसरातच उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. मागील तब्बल ३० वर्षांपासून देवस्थान परिसरात गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जात असून, या काळात वाहतूक, नागरिकांची ये-जा आणि परिसरातील भक्तांच्या भावनांचा विचार करून उत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजजागृती, एकजूट आणि विधायक कार्याचा जो आदर्श घालून दिला, त्याच विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे, अशी भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
उत्सवाच्या माध्यमातून समाजबांधवांना कोणतीही गैरसोय होऊ नये, भक्तांच्या भावनांचा आदर राखला जावा आणि गणेशोत्सवाला विधायक कार्याची जोड मिळावी, यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुहूर्तमेढ कार्यक्रमाला विद्यमान अध्यक्ष राजू दळवी, अशोक ढेगस्कर, वैजनाथ गिलबिले, प्रशांत पाटील, सुबोध गावडे, सतीश गोडसे, दिनेश तावनोजीचे, अमित कारेकर, दिनेश कोल्हापुरे, महेश तवनोजीचे, सर्वज्ञ गिलबिले तसेच मंदिराचे पुरोहित देशपांडे काका आणि भक्तगण उपस्थित होते.
