शहरातील विकासकामांच्या दुरवस्थेवर श्रीराम सेना हिंदुस्थान आक्रमक

शहरातील विकासकामांच्या दुरवस्थेवर श्रीराम सेना हिंदुस्थान आक्रमक

अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची पत्रकार परिषद; गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये विकासकामांच्या नावाखाली नागरिकांना होणारा त्रास, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी पत्रकार परिषद घेतली.

“कोणत्याही राजकीय किंवा वैयक्तिक हेतूने ही पत्रकार परिषद घेतलेली नसून, एक नागरिक म्हणून शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे,” असे रमाकांत कोंडुस्कर यांनी स्पष्ट केले.

L&T कंपनीकडून गॅस पाइपलाइनसाठी वर्षानुवर्षे रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसाळ्यात तसेच गणेशोत्सवाच्या काळात या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघातांचा धोका वाढला असून, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची डागडुजी अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचा आरोप कोंडुस्कर यांनी केला.

याशिवाय E-Aasthi, PID (Property Identification Number) क्रमांक आणि इलेक्ट्रिक मीटर मिळवताना नागरिकांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार मागणी करूनही पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.

सरकारी दवाखान्यांची दयनीय अवस्था आणि महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची कमतरता याकडेही प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.

खासबाग भाजी मार्केट तसेच टिळकवाडी साई मंदिर परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या दुकान गाळ्यांचा योग्य वापर होत नसल्याचा मुद्दाही कोंडुस्कर यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या करातून पैसा खर्च होत असताना त्याचा योग्य उपयोग होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका हद्दीतील उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असतानाही नागरिकांकडून देखभालीच्या नावाखाली मासिक शुल्क गोळा केले जात असल्याचा आरोप करण्यात आला. नागरिकांकडून कर घेऊन पुन्हा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे योग्य नसल्याचे कोंडुस्कर यांनी नमूद केले.

तसेच स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. L&Tच्या कर्मचाऱ्यांकडून पाइप जोडणी, रोड कटिंग आदी कामांसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या दहा दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रमाकांत कोंडुस्कर यांनी केली. रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

शहरातील विकासकामांचा दर्जा, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − ten =

error: Content is protected !!