कृतज्ञता हीच खरी उपासना; निरपेक्ष सेवेतूनच जीवन यशस्वी होते – प्रल्हाद वामनराव पै

कृतज्ञता हीच खरी उपासना; निरपेक्ष सेवेतूनच जीवन यशस्वी होते – प्रल्हाद वामनराव पै

बेळगाव : “आपल्याकडे जे काही आहे ते सद्गुरूंच्या कृपेने आहे, याची सतत जाणीव ठेवून त्यांनी दिलेले ज्ञान जीवनात भिनवले पाहिजे. पद, पैसा, मान-सन्मान किंवा कौतुकाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने कार्य करणारा कार्यकर्ताच खरा कार्यकर्ता असतो,” असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे प्रमुख मार्गदर्शक प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

जीवन विद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव २०२६ ‘कृतज्ञता दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा मंदिर सभागृहात रविवारी झालेल्या या भव्य सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रल्हाद पै यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘कृतज्ञता हीच खरी उपासना’ या विषयावरील आपल्या प्रबोधनात त्यांनी, “जीवन कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर उभे असले पाहिजे. ‘कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात’ हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. संपत्ती, प्रतिष्ठा आणि सत्ता मिळाल्यानंतर माणसात अहंकार निर्माण होतो. त्यामुळे ज्ञानाबरोबरच शहाणपण देणाऱ्या सद्गुरूंचे विचार आत्मसात केल्यास जीवन निश्चितच यशस्वी होते,” असे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सत्ता, संपत्ती आणि पदामुळे वाढणारा अहंकार माणसाच्या अधःपतनाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे आनंद वाटा, आनंद लुटा आणि जीवन आनंदी बनवा.”

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त रविवारी सकाळी हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘संगीत जीवन विद्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी नृत्य-गीतांचे सादरीकरण केले. गुरुपूजन अंतर्गत ११ जोडप्यांच्या हस्ते सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार सामूहिक मानसपूजाही संपन्न झाली.

यावेळी जीवन विद्या मिशनच्या बेळगाव शाखेला सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा प्रल्हाद पै यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अवयवदान आणि रक्तदान उपक्रमांमध्ये सहकार्याबद्दल केएलई प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या वतीने प्रीती दोडवाड आणि डॉ. माधव प्रभू यांनी प्रल्हाद पै यांचा सन्मान केला. अवयवदानाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत सुमारे ३५० जणांनी अवयवदानासाठी अर्ज भरले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवचनकार शंकरराव बांदकर, बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिरजे, सल्लागार प्रभाकर देसाई, अंतर्गत हिशेब तपासणीस तानाजी पाटील तसेच मुंबईचे पालक ट्रस्टी विलास परब यांनी विशेष परिश्रम घेतले.

बेळगाव आणि परिसरात जीवन विद्या मिशनची २८ उपकेंद्रे कार्यरत असून, गुरुपौर्णिमा महोत्सवाला सुमारे ४ हजार साधक व नागरिक उपस्थित होते. सोमवारी मराठा मंडळ पॉलिटेक्निक येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर सद्गुरूंनी दिलेली विश्वप्रार्थना आणि “प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची” ही प्रार्थना सामूहिकरीत्या करण्यात आली.

शेकडो साधकांना अनुग्रह

यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांच्या हस्ते शेकडो साधकांना अनुग्रह देण्यात आला. संगतीचे महत्त्व विशद करत त्यांनी, “शरीराची काळजी घ्या, चांगला आहार घ्या, चांगले विचार करा, म्हणजे प्रकृतीही उत्तम राहील,” असा संदेश दिला. संपूर्ण मराठा मंदिर परिसर भक्ती, कृतज्ञता आणि उत्साहाच्या वातावरणाने भारावून गेला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मधुरा शिरोडकर आणि प्रशांत बिरजे यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

error: Content is protected !!