बेळगाव : श्रीभक्ती महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सभासदांच्या हिताचा विचार करून नवीन गोल्ड लोन योजना सुरू केली असून, यामुळे सभासदांना अत्यंत लाभदायी आर्थिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांनी दिली. त्या रविवारी न्यू गुडशेड रोड येथील श्रीमाता सभागृहात आयोजित संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.
यावेळी ज्योती अग्रवाल म्हणाल्या की, सध्या सोन्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांसाठी आर्थिक गरजा भागविणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन संस्थेने सभासदांसाठी सुलभ आणि लाभदायी गोल्ड लोन योजना सुरू केली आहे. पारदर्शक कारभार, वेळेत कर्जवाटप, थकबाकीची नियमित वसुली आणि सभासदाभिमुख सेवा या धोरणामुळे संस्थेने सातत्याने प्रगती केली असून, चालू आर्थिक वर्षात संस्थेला २९ लाख ७८ हजार ६१० रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या संचालिका श्वेता देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सचोटीच्या कारभारामुळे संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेची वार्षिक उलाढाल ६६.८३ कोटी रुपये असून, २८.८७ कोटी रुपयांचे खेळते भांडवल असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद सभेसमोर सादर केला. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.
सोसायटीचे व्यवस्थापक अतुल कुलकर्णी यांनी मागील वर्षाच्या वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून दाखविला.
यावेळी व्यासपीठावर संचालिका वंदना चव्हाण, शोभा किल्लेकर, कल्पना देसाई, ज्योती पाटील आणि श्रद्धा रेवणकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धा रेवणकर यांनी आभार मानले. सभा यशस्वी करण्यासाठी रिकव्हरी ऑफिसर सुनील पाटील यांच्यासह संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
