बेळगाव-गोवा रेल्वे सेवा सुधारणा आणि हबळी-एलटीटी एक्सप्रेसला अतिरिक्त डबे देण्याची व्यापारी संघटनांची मागणी

बेळगाव-गोवा रेल्वे सेवा सुधारणा आणि हबळी-एलटीटी एक्सप्रेसला अतिरिक्त डबे देण्याची व्यापारी संघटनांची मागणी

बेळगाव : बेळगाव–गोवा रेल्वे मार्गावरील प्रवासी सुविधा वाढविणे, अधिक रेल्वेगाड्या सुरू करणे तसेच हबळी–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याच्या मागणीसाठी ट्रेडर्स कौन्सिल, बेळगाव आणि बेळगाव क्लॉथ सिल्क अँड टेक्सटाईल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (४ ऑगस्ट) बेळगाव रेल्वे स्थानक येथे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

सकाळी ११.३० वाजता स्टेशन सुपरिटेंडंट दशरथ प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतरही बेळगाव–गोवा मार्गावर अपेक्षित रेल्वे सेवा सुरू झालेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भातील सविस्तर निवेदन दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांनाही पाठविण्यात आले आहे.

व्यापारी संघटनांनी बेळगाव–वास्को-द-गामा दरम्यान दररोज सकाळची इंटरसिटी/मेमू/डेमू प्रवासी रेल्वे सुरू करावी, साप्ताहिक बेळगाव–गोवा एक्सप्रेसचे दैनिक एक्सप्रेसमध्ये रूपांतर करावे, विद्युतीकरणानंतर प्रवासाचा कालावधी कमी करावा, अतिरिक्त इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी तसेच मार्गावरील स्थानकांवरील प्रवासी सुविधा सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे.

याशिवाय हबळी–लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र. १७३१७/१८) एक्सप्रेसमध्ये वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन किमान चार अतिरिक्त स्लीपर डबे आणि एक एसी ३-टियर डबा जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या गाडीचे वेळापत्रक बदलून मुंबईकडे जाताना बेळगाव येथे रात्री सुमारे ८ वाजता आगमन होईल, अशी व्यवस्था करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या मागण्या पूर्ण झाल्यास बेळगाव आणि गोवा दरम्यान व्यापार, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल, तसेच उत्तर कर्नाटकातील उद्योग व व्यापारी क्षेत्रालाही मोठा फायदा होईल, असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला.

यावेळी ट्रेडर्स कौन्सिलचे अध्यक्ष तथा दक्षिण पश्चिम रेल्वेचे माजी डीआरयूसीसी सदस्य सतीश तेंडोलकर, बेळगाव क्लॉथ सिल्क अँड टेक्सटाईल मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी मुकेश संघवी, मुकेश खोडा, कमलेश खोडा, एल. एस. छापरू, नितेश जैन आणि अरुण कुलकर्णी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 11 =

error: Content is protected !!