कॅलिफोर्निया (अमेरिका) : कॅलिफोर्नियातील ‘बे एरिया’मधील प्लेझन्टन शहरात रविवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी ज्येष्ठ साहित्यिक यांच्या अजरामर ‘वाऱ्यावरची वरात’ या नाट्याविष्काराचा बहारदार प्रयोग रंगला. ‘बे फ्रेंड्स’ यांच्या आयोजनाखाली आणि ‘कुंकु प्रॉडक्शन्स’च्या निर्मितीत विलो रोडवरील जय गणेश स्टुडिओमध्ये हा हाऊसफुल्ल प्रयोग सादर करण्यात आला.
‘वाऱ्यावरची वरात’चे मूळ लेखन पु. ल. देशपांडे यांचे असून मेधा मराठे यांनी संपादित केलेल्या या नाट्याविष्काराचे दिग्दर्शन जगदीश कुंटे यांनी केले. बेळगाव, नाशिक आणि कॅलिफोर्निया येथील कलाकारांनी या प्रयोगात सहभाग घेतला. विशेषतः कुंटे आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्यांनी रंगमंचावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रयोगाच्या प्रारंभी भालचंद्र कुंटे यांनी बेळगावचे कवी अविनाश ओगले यांच्या निवडक विडंबन कवितांचे सादरीकरण केले. ‘भूगोलाच्या बाई’, ‘सौभाग्यवतीला ताप म्हणालो’, ‘पुण्याचे प्रदूषण’, ‘मिसळ चापतो तर्रीची’, ‘कंट्रोल झेड’ तसेच ‘कणा’ या प्रसिद्ध कवितेच्या विडंबनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मध्यंतरानंतर सादर झालेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या प्रयोगात मंदार, वीणा, अपूर्वा, नील, भालचंद्र, महिमा, नीता, मिलिंद आणि जगदीश कुंटे, तसेच निहार, स्वप्नाली, उर्वी कुलकर्णी, अजित रानडे आणि आझाद दहिया यांनी भूमिका साकारल्या. पार्श्वसंगीत अमेय पोतदार यांचे, तर निवेदन प्रणाली उबाळे यांनी केले.
संपूर्ण प्रयोगादरम्यान प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक प्रसंगाला हास्यकल्लोळ उसळत होता आणि अखेर हा प्रयोग हाऊसफुल्ल ठरला. ‘बे फ्रेंड्स’च्या हेमाली गोंधळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
तीन पिढ्यांचा अनोखा सहभाग
या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकाच रंगमंचावर एकत्र अभिनय केला. जगदीश कुंटे यांनी पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारली, त्यांचे चिरंजीव मंदार कुंटे यांनी सूत्रधाराची भूमिका निभावली, तर मंदार यांचा मुलगा नील याने ‘पाताडे सायकल मार्ट’च्या प्रतिनिधीची भूमिका साकारत तीन पिढ्यांचा हा दुर्मिळ रंगमंचीय संगम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
