बेळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व राज्य विकास मराठी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत करून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. मराठी शाळांच्या संवर्धनासाठी समिती सातत्याने करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की, मराठी शाळा टिकाव्यात, त्यांची पटसंख्या वाढावी आणि मातृभाषेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने समितीच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. “मराठी शाळा टिकल्या तरच मातृभाषा टिकेल आणि मातृभाषा टिकली तरच आपली संस्कृती जपली जाईल,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सरचिटणीस श्रीकांत कदम तसेच पदाधिकारी सुरज कुडुचकर आणि अक्षय बांबरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
