बेळगाव, दि. २४ जुलै : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अधिक सुरक्षित, नियोजनबद्ध, स्वच्छ आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्व विभागांचा समन्वय साधून पूर्वतयारीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ, बेळगावच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
महामंडळाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांची संयुक्त बैठक तातडीने बोलावून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. यंदाचा १२ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार असून शहरासह ग्रामीण भागातील शेकडो गणेश मंडळे या उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे उत्सव काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महामंडळाने प्रशासनाकडे सिंगल विंडो परवानगी व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि मंडळांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच शहरातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, गणेश मंडळ परिसर आणि विसर्जन मार्गांची नियमित स्वच्छता, धोकादायक विद्युत तारा हटवून सुरक्षित वीजपुरवठा आणि पुरेशा रस्ते दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणे, महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, उघड्या गटारी झाकणे, विसर्जन काळात ग्रामीण भागातील भाविकांसाठी अतिरिक्त रात्रीच्या बस सेवा सुरू करणे, तसेच आवश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांना उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी लक्षात घेता वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी चौक या मार्गावर तात्पुरती प्रेक्षक गॅलरी उभारावी, तसेच गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कार्यशाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून मूर्ती वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.
महामंडळाने हेस्कॉमकडे गणेश मंडळांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी असलेल्या अटी सुलभ करण्याची मागणी केली आहे. मंडळ अध्यक्षांच्या वैयक्तिक वीजजोडणीशी संबंधित असलेली जबाबदारी कमी करून प्रक्रिया अधिक सोपी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनात गणेशोत्सवाचा उपयोग सामाजिक जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ म्हणून करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान व अवयवदान जनजागृती, सीपीआर प्रशिक्षण, रस्ते सुरक्षा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, पर्यावरण संवर्धन, डिजिटल सुरक्षा, शासकीय योजनांची माहिती, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, स्टार्टअप प्रोत्साहन आणि विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महामंडळाच्या मते, सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव न राहता समाजप्रबोधन, सार्वजनिक आरोग्य, युवक सक्षमीकरण आणि नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढविणारे प्रभावी व्यासपीठ ठरू शकते. त्यामुळे शासनाने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, कार्यकारी सचिव प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, तसेच सुनील बोकडे, प्रसाद मरगाळे, दुर्गाप्रसाद जोशी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
