बेळगाव, १८ जुलै : शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दागिन्यांच्या दुकानातील कथित चोरीचा प्रकार अवघ्या एका दिवसात उघडकीस आला असून, धक्कादायक बाब म्हणजे चोरीची तक्रार दाखल करणारा दुकानमालकच या प्रकरणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ₹65.95 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णानंद विश्वनाथ वेर्णेकर, रा. सावरकर रोड, टिळकवाडी यांनी 17 जुलै रोजी रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेर्णेकर अँड सन्स या दागिन्यांच्या दुकानात 16 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार खडेबाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि संशयास्पद हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. चौकशीत तक्रारदार कृष्णानंद वेर्णेकर याच्यावर संशय बळावल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यानेच दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम स्वतःच्या दुचाकीत ठेवून नेल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून ₹45,000 किमतीची दुचाकी, 519.8 ग्रॅम सोन्याचे दागिने (₹62,60,990), 31 ग्रॅम चांदीचे दागिने (₹6,000) आणि ₹2,83,010 रोख रक्कम असा एकूण ₹65,95,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या उत्कृष्ट तपासाबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.
