SIR प्रक्रियेबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी महत्त्वाची बैठक

SIR प्रक्रियेबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी महत्त्वाची बैठक

बेळगाव : सीमाभागातील मतदार फेरनिवडणी प्रक्रिया (SIR) राबविण्यात येत असून या प्रक्रियेचे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध असल्याने मराठीतही अर्ज उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.

यासंदर्भात शुक्रवारी बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघांच्या निवडणूक प्रभारी अधिकारी असलेल्या महानगरपालिका आयुक्त व उपआयुक्त यांची समितीच्या प्रतिनिधींनी तसेच आजी-माजी नगरसेवकांनी भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच महाराष्ट्र एकीकरण समितीलाही प्रक्रियेची माहिती देण्यात यावी आणि समितीच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (BLA/पोलिंग एजंट) यादी सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समितीने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील समितीचे कार्यकर्ते, चौक प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी जिल्हा पंचायत सदस्य तसेच मराठी भाषिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी (पोलिंग एजंट) म्हणून काम करण्यास इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांची यादी सोबत आणावी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर, एम. जी. पाटील आणि अमर येक्कुंदीकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 9 =

error: Content is protected !!