बेळगाव, दि. 25 जून : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या 24 गुन्ह्यांमधील जप्त अमली पदार्थांची गुरुवारी (25 जून) सकाळी 11.30 वाजता वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
या कारवाईत एकूण ₹57,78,900 किमतीचे 38 किलो 197 ग्रॅम 28 मिलीग्रॅम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. त्यामध्ये 24 किलो 131 ग्रॅम 45 मिलीग्रॅम गांजा (15 प्रकरणे), 120 ग्रॅम 83 मिलीग्रॅम हेरॉईन (8 प्रकरणे) आणि 13 किलो 945 ग्रॅम हशीश (1 प्रकरण) यांचा समावेश होता.
जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट ड्रग्स डिस्पोजल कमिटीच्या देखरेखीखाली करण्यात आली. या प्रक्रियेस बेळगाव शहराचे पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी, सीसीआरबीचे अधिकारी, पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, औषध नियंत्रण विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सदर अमली पदार्थांची विल्हेवाट बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील हारुगोप्पा येथील अधिकृत प्रकल्पात सर्व कायदेशीर नियम व पर्यावरणीय निकषांचे पालन करून वैज्ञानिक पद्धतीने लावण्यात आली.
अमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीविरोधात बेळगाव शहर पोलीस सातत्याने कठोर कारवाई करत असून, जप्त केलेल्या अमली पदार्थांचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यांचा नियमानुसार नाश करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले.
