बेळगाव : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर, प्रमाणपत्र व कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू असून सीमाभागातील विद्यार्थ्यांनी माफक शुल्कात उच्च शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव विनय शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे समन्वयक डॉ. सचिन भोसले, डॉ. नगिना माळी तसेच मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. सचिन भोसले आणि डॉ. नगिना माळी यांनी विद्यापीठामार्फत उपलब्ध असलेल्या विविध पदवी, पदव्युत्तर व सर्टिफिकेट कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. तसेच अभ्यास केंद्रांची माहिती, शैक्षणिक प्रगती, करिअर विकासाच्या संधी आणि दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले.
पदवी शिक्षण पूर्ण करू इच्छिणारे युवक-युवती, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, सैनिक, नोकरदार, गृहिणी, उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी दूरशिक्षण प्रणाली अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे उपकुलसचिव विनय शिंदे आणि डॉ. सचिन भोसले यांनी दिली.
या शिबिराला महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सुरज कुडुचकर, महेश जुवेकर, सुहास हुद्दार यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
