बेळगाव : आरपीडी पदवीपूर्व कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात साहित्यिक प्रा. महादेव खोत लिखित ‘मातीचा श्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ज्येष्ठ लेखिका प्रा. माधुरी शानभाग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लेखकाचा प्रवास, लेखनाचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण वाचन-चिंतनातून लेखनकौशल्य कसे विकसित होते याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या लेखनप्रवासातील अनुभव कथन करत त्यांनी विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखनाकडे वळण्याचे आवाहन केले. साहित्य हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुण्या प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी ‘मातीचा श्वास’ या पुस्तकाचा परिचय करून देताना त्यातील आशय, ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्रण आणि सामाजिक संवेदनांचा वेध घेतला. साहित्याची समृद्ध परंपरा जपून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नवोदित कवी आणि लेखकांवर असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लता कित्तूर या होत्या. यावेळी आरपीडी पीयू महाविद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती शिंदे तसेच आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. परसू गावडे यांनी केले. विद्यार्थिनी सलोनी नाईक हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. विद्या डुकरे यांनी केले, तर सोनल बिर्जे हिने आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकवृंद तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लेखक, वाचन आणि साहित्य यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. साहित्यप्रेम वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना लेखन-वाचनाची प्रेरणा देण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
