कन्नड शिक्षकावर विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचा आरोप; संतप्त पालकांकडून मारहाण, शिक्षक ताब्यात

कन्नड शिक्षकावर विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचा आरोप; संतप्त पालकांकडून मारहाण, शिक्षक ताब्यात

चिक्कोडी, ता. १७ जून : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील उर्दू शासकीय हायस्कूलमधील एका कन्नड शिक्षकावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकाला जाब विचारत मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील कन्नड शिक्षक श्रीशैल कुंभार यांच्यावर विद्यार्थ्यांना कन्नड विषयात उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवून वर्गखोल्या तसेच शौचालय परिसरात नेऊन अयोग्य वर्तन व लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याची माहिती समोर आल्यानंतर पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला आणि त्यानंतर मारहाण केली. त्यामुळे काही काळ शाळा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी शिक्षक श्रीशैल कुंभार यांना ताब्यात घेतले असून पालक, शाळेतील कर्मचारी व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांकडून विद्यार्थ्यांचेही जबाब नोंदविण्यात येत असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर घटनेमुळे चिक्कोडी परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार असून, प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 3 =

error: Content is protected !!