बेळगाव, 14 जून : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर गटशिक्षण विभागात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा रविवारी श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक म्हणून प्रा. ॲड. सरिता सतीश पाटील उपस्थित होत्या. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे तसेच सीमाप्रश्नासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविकात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून युवा समिती हा उपक्रम सातत्याने राबवत असून यावर्षी राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा युवा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख वक्त्या प्रा. ॲड. सरिता पाटील यांचे स्वागत व सत्कार माजी नगरसेविका सुधा भातकांडे आणि शिवानी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा. ॲड. सरिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणातील दिशा, ध्येय आणि आव्हानांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःची ओळख स्वतः करून घ्यावी आणि इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या क्षमता व आवडीनुसार करिअरची दिशा निवडावी, असे त्यांनी सांगितले. मातृभाषेवर प्रभुत्व मिळविल्यास जगातील कोणतीही भाषा आत्मसात करणे कठीण नसल्याचे नमूद करत त्यांनी मराठी भाषेच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या विकासासाठीही व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नियमित शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीय युवक मोठ्या प्रमाणात विविध शासकीय पदांवर कार्यरत दिसून येत असताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे ओझे न मानता त्यातील प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्यावा तसेच करिअरची उद्दिष्टे ठरविताना एकाच पर्यायावर अवलंबून न राहता विविध पर्याय खुले ठेवावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय समाजातील विविध क्षेत्रांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी भविष्यात नेतृत्वगुणांचा अभाव असलेली पिढी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी समिती सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून मराठी भाषा, मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी युवा समितीच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला.
या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
सत्कारप्राप्त गुणवंत विद्यार्थी
खानापूर तालुका
- प्रथम : जान्हवी शामराव पाटील (राज्यात मराठी माध्यमात प्रथम)
- द्वितीय : निकिता लक्ष्मण चौरी
- तृतीय : सोनाली तुकाराम दळवी
बेळगाव ग्रामीण विभाग
- प्रथम : प्राजक्ता उत्तम चौगुले
- द्वितीय : पल्लवी सुरज पाटील
- तृतीय : समीक्षा लक्ष्मण कोवाडकर
बेळगाव शहर विभाग
- प्रथम : सोहम सतीश हळदणकर
- द्वितीय : स्नेहा यल्लाप्पा हिरोजी
- तृतीय : अनिकेत बाळकृष्ण जाधव
कार्यक्रमास समितीचे नेते रणजीत चव्हाण पाटील, आबासाहेब दळवी, आर. एम. चौगुले, निरंजन सरदेसाई, मदन बामणे, ॲड. सुधीर चव्हाण, सुनील बाळेकुंद्री, सुधा भातकांडे, शिवानी पाटील, उमेश पाटील, श्रीधन मळीक, विश्वजित हसबे, अमित देसाई, महेश चौगुले, गुणवंत पाटील, सुनील मुरकुटे, भाऊ किल्लेकर, सोमशेखर सुतार, प्रदीप दळवी, शिवराज पाटील, प्रा. राहुल जाधव, प्रा. अशोक अलगोंडी, सागर मरगानाचे, सागर पाटील, प्रशांत भातकांडे, प्राजक्ता केसरकर, तनुजा कावळे, वृषाली पाटील, सचिन केळवेकर, वासू सामजी, राजू कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, शेखर तळवार, महांतेश अलगोंडी, रोहन कुंडेकर, निखिल देसाई, सुरज चव्हाण, आशिष कोचेरी, साईराज जाधव, प्रवीण रेडेकर, अश्वजीत चौधरी, आकाश भेकणे, विकास भेकणे, प्रवीण धामणेकर, सौरभ तोंडले, ओमकार नारळकर, श्री पाटील, शुभम कांबळे, हेमंत गुरव यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक पाटील यांनी केले तर आभार साईनाथ शिरोडकर यांनी मानले. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
