बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जायंट्स ग्रुपच्या वतीने खासबाग येथील आठवडी बाजारात प्लास्टिकमुक्तीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना सुमारे १,००० कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
यावेळी नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम समजावून सांगत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाला बाजारातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण संरक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी सुनिल मुतगेकर, अशोक हलगेकर, अरुण काळे, मंजुनाथ शिरोडकर, राजू बांदिवडकर, राजू जैन, महादेव भस्मे, आनंद कुळकर्णी, ईश्वर पाटील, राहुल बेलवलकर, सुनिल मुरकुटे, शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जायंट्स ग्रुपच्या या उपक्रमामुळे प्लास्टिकमुक्त बेळगावच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
