खानापूर : तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता चौथीसाठी देण्यात आलेले ‘व्हॅल्यू एज्युकेशन’ (मूल्यशिक्षण) विषयाचे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावे तसेच सरकारी मराठी शाळांमधील रिक्त शिक्षक पदांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूरच्या युवा कार्यकर्त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कर्नाटक शालेय शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षण विषयाचा समावेश केला असून त्यासाठी पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र हे पुस्तक केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खानापूर, बेळगाव, निपाणी, चिकोडी आणि रायबाग परिसरातील मराठी शाळांनाही याच स्वरूपाची पुस्तके देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘काइंडनेस ट्री’, ‘माय बेस्ट फ्रेंड – कॅरेक्टरिस्टिक्स’ आणि ‘युनिव्हर्सॅलिटी अँड अॅक्सेप्टन्स’ यांसारखे धडे इंग्रजी व कन्नड मिश्रित भाषेत असल्याने मराठी विद्यार्थ्यांना ते समजून घेण्यात अडचणी येत आहेत. कन्नड भाषेचे पूर्ण ज्ञान नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकाचा अभ्यास करणे कठीण ठरत असल्याची बाब शिक्षकांनी निदर्शनास आणून दिली आहे. परिणामी शिक्षकांना प्रत्येक धडा मराठीत समजावून सांगावा लागत असून अध्यापनासाठी अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षण महत्त्वाचे असले तरी ते मातृभाषेत उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शिक्षक व पालकांचे मत आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण पुस्तकाची मराठी आवृत्ती तातडीने प्रकाशित करावी किंवा स्वतंत्र मराठी पुस्तक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच तालुक्यातील अनेक सरकारी मराठी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे काही पालक मराठी शाळांमध्ये मुलांचा प्रवेश घेण्यास टाळाटाळ करत असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त पदांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या दोन्ही मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागातून संबंधित कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
निवेदन सादर करताना श्री पाटील, बाळकृष्ण पाटील, स्वराज्य पाटील, अतिश फटान, शुभम कांबळे, गणेश बेळगावकर, राम चिखलकर, नामदेव कुट्रे, मुकेश गुरव, शिवा पाटील आदी उपस्थित होते.
