सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा तीव्र विरोध

सावगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांचा तीव्र विरोध

बेळगाव : सावगाव येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेत कन्नड माध्यमाचे वर्ग सुरू करण्याच्या हालचालींमुळे संपूर्ण मराठी भाषिकांत तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुधारणा समिती व ग्रामस्थांच्या वतीने बेळगाव ग्रामीण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सदर मराठी शाळा ही १९४८ साली सुरू झाली असून अनेक पिढ्यांचे शिक्षण या शाळेतून झाले आहे. गावातील मराठी भाषिकांसाठी ही शाळा भावनिक व ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाची मानली जाते. मात्र यावर्षी याच शाळेत कन्नड माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या घटनेमुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने बेळगाव ग्रामीण विभागाचे बीईओ अधिकारी थेट सावगाव शाळेत दाखल झाले.

यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर शाळेतील विविध समस्या मांडल्या. शाळेची विद्यार्थी संख्या आधीच मोठी असून अनेक वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्गखोल्यांमध्ये गळती होत असून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत एकाच इमारतीत दोन माध्यमांचे वर्ग सुरू केल्यास मराठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

बीईओ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना एक महिन्याचा कालावधी देण्याची विनंती करत कन्नड माध्यमाच्या शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र यावेळी शाळा सुधारणा समिती व ग्रामस्थांनी मराठी शाळेच्या इमारतीत कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्यास स्पष्ट विरोध केला.

ग्रामस्थांनी जुनी शाळा स्वच्छ करून वापरात आणावी, अशी सूचना केली. तसेच जुनी इमारत दुरुस्त होईपर्यंत अन्यत्र भाडेतत्त्वावर खोली घेऊन कन्नड शाळा चालवावी, त्यासाठीचे भाडे आम्ही भरण्यास तयार आहोत; मात्र मराठी माध्यमाच्या शाळेत कन्नड वर्ग सुरू करू नयेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन बीईओ अधिकाऱ्यांनी सदर मागणीची दखल घेत पर्यायी जागा शोधून त्या ठिकाणी कन्नड माध्यमाची शाळा सुरू करण्याचे मान्य केले. त्यामुळे तात्पुरता तणाव निवळला असला तरी मराठी भाषिक ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर सागावकर, बेळगाव क्षेत्र शिक्षणाधिकारी दान्नामा जाळकी, शिक्षण संयोजक (ECO) बडीगेर, क्लस्टर प्रमुख सतीश पाटील, मुख्याध्यापक एल. एस. चांदीलकर, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, प्रवक्ते पियूष हावळ, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, मोतेस बारदेसकर, अनिल हेगडे, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, सचिन केळवेकर, बसवंत घाटेगस्ती, निंगाप्पा मोरे, परशराम आकनोजी, यल्लाप्पा पाटील, दर्शन घाटेगस्ती, प्रदीप मोरे, योगेश आकनोजी, महेश कदम, निकिता पाटील, रेखा घाटेगस्ती, अनिता बसरीकट्टी, सुजाता काकतकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 19 =

error: Content is protected !!