बेळगाव, दि. 3 जून : शहर गुन्हे शाखेने (CCB) गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर धाड टाकून पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी हळगा-माचे बायपास रस्त्यावरील माचे जंक्शन परिसरात काहीजण गांजाची विक्री करत असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती. त्यानुसार सीसीबीचे पीआय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत कृष्णा ऊर्फ राजू अशोक रामण्णावर (27, गणपती गल्ली, नावगे), प्रमोद सहदेव पाटील (34, पाटील गल्ली, रणकुंडे), रामकृष्ण निवृत्ती मावूरकर (32, चंदगड, जि. कोल्हापूर), परशुराम कल्लप्पा बुगडीकट्टी (25, जयनगर, माचे) आणि जानू विठ्ठल गावडे (45, कुंभारडा, ता. खानापूर) यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे :
- 2 किलो 334 ग्रॅम गांजा – किंमत ₹1,20,000
- एक एक्सएलआर कार – किंमत ₹7,00,000
- एक होंडा डिओ दुचाकी – किंमत ₹30,000
- पाच मोबाईल फोन – किंमत ₹25,000
- रोख रक्कम – ₹46,000
असा एकूण ₹9,21,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
