मराठी फलक हटविण्याच्या प्रकाराला आळा घाला; अन्यथा 22 जूनला आंदोलनाचा इशारा

मराठी फलक हटविण्याच्या प्रकाराला आळा घाला; अन्यथा 22 जूनला आंदोलनाचा इशारा

बेळगाव, दि. 3 जून : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी परिसरातील शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच व्यापारी प्रतिष्ठानांवरील मराठी फलक पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. तसेच मराठी फलक हटविणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि फलकांना लक्ष्य करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगळे, कार्याध्यक्ष मनोहर किनेकर आणि सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या स्वाक्षरीचे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बेळगाव, खानापूर, निपाणी आणि अथणी तालुक्यांमध्ये मराठी भाषा दीर्घकाळापासून शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक व्यवहारांमध्ये वापरली जात होती. या भागात मराठी भाषिकांची लक्षणीय संख्या असल्याने मराठी भाषेचा वापर आणि फलकांवरील मराठी मजकूर कायम ठेवणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.

निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, कर्नाटक अधिकृत भाषा कायदा आणि इतर तरतुदींचा आधार घेत काही शासकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख मराठीतील फलक हटवत आहेत. तसेच खासगी दुकानदार आणि व्यावसायिकांच्या मराठी फलकांनाही लक्ष्य केले जात असल्याचे समितीने म्हटले आहे.

समितीने यापूर्वी 11 ऑगस्ट 2025 रोजीही यासंदर्भात निवेदन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. निवेदनात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा तसेच भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठी फलक हटविण्याचे प्रकार तात्काळ थांबवून मराठी फलक पूर्ववत करावेत, तसेच खासगी व्यावसायिकांच्या फलकांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

22 जूनपर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + 8 =

error: Content is protected !!