खानापूर म. ए. समितीचा मराठी फलकांबाबत आक्रमक पवित्रा

खानापूर म. ए. समितीचा मराठी फलकांबाबत आक्रमक पवित्रा

सीमाप्रश्न, हुतात्म्यांना अभिवादन व मराठी संवर्धनासाठी विविध ठराव

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष श्री गोपाळराव बळवंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स. चिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी केले.

बैठकीत १ जून १९८६ च्या कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना तसेच सीमाभागातील विविध आंदोलनातील कार्यकर्त्यांना १ जून २०२६ रोजी हिंडलगा येथे उपस्थित राहून अभिवादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारी कार्यालये व आस्थापनांवरील मराठी फलकांच्या प्रश्नावर कन्नड वेदिकेने आणि प्रशासनाने घेतलेल्या विरोधी भूमिकेविरोधात आवाज उठवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जे आदेश देईल, त्याला खानापूर समितीचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी घोषणा बैठकीत करण्यात आली.

तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री धैर्यशील माने व इतर सदस्यांशी संपर्क साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून मुंबईतील मुख्यमंत्री निवासासमोर धरणे आंदोलन आयोजित करावे, असा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला.

बेळगाव महानगरपालिकेतील मराठी नगरसेवक श्री रवी साळुंखे, श्री शिवाजी मंडोळकर आणि श्रीमती वैशाली भातखंडे यांनी मराठीचा ठाम आवाज उठवत सीमाप्रश्न सोडवणुकीविरोधातील ठराव फेटाळून लावल्याबद्दल खानापूर म. ए. समितीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाचा खटला विनाविलंब सुरू व्हावा यासाठी उच्चाधिकार समिती व तज्ञ समितीची तातडीने बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच २४ मे २०२६ रोजी शिवस्मारक येथे मराठी युवक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करण्याचा निर्धार करण्यात आल्याबद्दल युवक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

राष्ट्रीय पक्षात प्रवेश केलेल्या आणि विविध पदे भूषविणाऱ्या व्यक्तींच्या कार्यक्रमांपासून समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी दूर राहावे तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीला बाधा येईल असे कोणतेही कार्य करू नये, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील व श्री राजाराम देसाई यांनी व्यक्त केले.

बैठकीला प्रकाश चव्हाण, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, अजित पाटील, जयसिंगराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, अमृत शेलार, एस. एच. गुरव, पुंडलिक पाटील, नागेश भोसले, संदेश कोडचवाडकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले, व्ही. व्ही. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत कै. टी. के. पाटील, कै. अर्जुनराव गोरल व इतर दिवंगत समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी सहसचिव रणजित पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + twenty =

error: Content is protected !!