ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

बेळगाव : येत्या रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांची निवड करण्यात आली असून साहित्यविश्वात याबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठी साहित्य, सामाजिक भान आणि विचारप्रधान लेखनासाठी ओळख असलेल्या यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षीय भाषणाकडे साहित्य रसिकांचे विशेष लक्ष लागले आहे.

या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून यंदाचे संमेलन साहित्य, शिवचरित्र आणि काव्याचा संगम ठरणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष यशवंत पाटणे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. मराठी भाषा, सीमाभागातील सांस्कृतिक प्रश्न आणि साहित्याची सामाजिक जबाबदारी या विषयांवर ते मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले.

दुसऱ्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोकप्रिय लोककवी प्रशांत मोरे यांच्या ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावरील गेय काव्यमैफल रंगणार आहे.

संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून नियोजनाची जबाबदारी पदाधिकाऱ्यांमध्ये वाटप करण्यात आली असल्याची माहिती उपाध्यक्ष डी. बी. पाटील यांनी दिली.

या बैठकीस डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर तसेच महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील, स्मिता किल्लेकर, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

error: Content is protected !!