बेळगाव : शहरात वाढत्या स्टॅबिंग आणि गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने विशेष मोहीम राबवत एका संशयिताला लांब कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.
13 मे 2026 रोजी माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अँटी स्टॅबिंग स्क्वॉडचे पथक गस्त घालत असताना मारुती नगर, तिसरा क्रॉस परिसरातील सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे बेकायदेशीररित्या लांब कोयता असल्याचे निदर्शनास आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लालुखान बाबुखान पठाण (वय 50, रा. मारुती नगर, बेळगाव) असे आहे. सार्वजनिक ठिकाणी धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा आणि गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने तो फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 96/2026 नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध Arms Act 1959 च्या कलम 27(1) तसेच Karnataka Police Act 1963 च्या कलम 97 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून लांब कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पीएसआय पी. एम. मोहिते आणि त्यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाच्या कार्याचे कौतुक केले आहे.
