बेळगाव शहर पोलिसांच्या सीसीबी पथकाने गांजा विक्रीप्रकरणी धडक कारवाई करत एका संशयिताला अटक केली असून सुमारे 3.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
10 मे 2026 रोजी सीसीबी विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद निसार सय्यद इसाक (वय 40, रा. आराध नगर, परळी, जि. बीड, महाराष्ट्र) हा आरोपी काकती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एनएच-48 सेवा मार्गावरील चिकरी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीसाठी आला होता. आरोपी हा गजानन नावाच्या व्यक्तीस गांजा विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सीसीबी विभागाचे पीआय श्री. मंजुनाथ नायक, पीएसआय श्री. मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडून 6 किलो 145 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे 3 लाख 5 हजार रुपये इतकी आहे. तसेच एक विवो कंपनीचा मोबाईल फोन, किंमत 5 हजार रुपये, असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 20(b)(ii)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सीसीबी विभागाच्या या कारवाईबद्दल पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
