अक्का पथकाची धडक कारवाई; दोन दिवसांत दोन बालविवाह रोखले

अक्का पथकाची धडक कारवाई; दोन दिवसांत दोन बालविवाह रोखले

बेळगाव शहरात अक्का पथकाने धडक कारवाई करत अवघ्या दोन दिवसांत दोन बालविवाह रोखून दोन अल्पवयीन मुलींना संरक्षण दिले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अक्का पथकाचे कौतुक केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंटमुरी कॉलनी परिसरात १७ वर्षीय मुलीचा विवाह लावण्यात येत होता. कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या लक्षात हा बालविवाहाचा प्रकार आला. तिने तत्काळ याची माहिती अक्का पथकाला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विवाह थांबवला.

याचप्रमाणे शहापूर परिसरात १३ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच अक्का पथकाने तातडीने कारवाई करत विवाह रोखला. दोन्ही प्रकरणांमध्ये मुलींच्या वडिलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती असूनही काही पालक विवाह लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे या घटनांमधून समोर आले आहे. मात्र अक्का पथकाच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन मुलींचे आयुष्य वाचले.

दरम्यान, शहरातील मुलींच्या सुरक्षेसाठी अक्का पथकाकडून शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, बाजारपेठा आदी ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येत आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

error: Content is protected !!