राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे राष्ट्रीय पुरस्कार २०२६ जाहीर

बेळगाव, दि. ३ (प्रतिनिधी):
राज्याचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) तर्फे स्व. राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान २०२६’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा अकादमीचे निमंत्रक कवी प्रा. प्रदीप पाटील व ज्येष्ठ सदस्य, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केली.

यंदाचा जीवन गौरव सन्मान साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रख्यात लेखक व अनुवादक डॉ सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर झाला असून, या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.

तसेच, विविध साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी खालील मान्यवरांची ‘राष्ट्रीय ललित कला सन्मान’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे:

  • सिसिलिया कार्व्हालो (मराठी कविता व ललित लेखन)
  • डॉ. विवेकानंद गोपाल (दक्षिण भारतातील मराठी भाषेचे योगदान)
  • डॉ. सुरेंद्र दरेकर (कथासाहित्य)
  • प्रा. डॉ. रणधीर शिंदे (समकालीन समीक्षा)

या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.

याशिवाय, ‘विशेष सन्मान’ पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसारासाठी अनंत कदम (होळसमुद्र, कर्नाटक) यांना जाहीर झाला असून, या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.

प्रसिद्ध विचारवंत व संत साहित्य अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारार्थींची निवड केली.

हा पुरस्कार वितरण समारंभ १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता श्री तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला असून, आ. जयंतराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी आणि शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारंभ आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे हे पुरस्कार वितरणाचे चौथे वर्ष असून, यापूर्वी पुणे, बडोदा आणि गोवा येथे समारंभ पार पडले आहेत.

स्व. राजारामबापू पाटील यांनी शिक्षण, सहकार, कृषी व उद्योग क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने अकादमीतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात येते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − 9 =

error: Content is protected !!