शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली, पिराजी मुचंडीकर यांनी केला अर्ज.

शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली, पिराजी मुचंडीकर यांनी केला अर्ज.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पिरणवाडी विभागातील समितीचे ज्येष्ठ नेते तसेच पिरणवाडी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष पिराजी मुचंडीकर यांनी शहर समितीकडे पत्र देत अध्यक्षपदासाठी आपल्या नावाचा विचार करण्याची मागणी केली आहे.

मुचंडीकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून समितीशी आजवर प्रामाणिक राहिले आहेत. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी आपण सातत्याने संघर्ष करत आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या नावाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी इतर काही नावेही चर्चेत आहेत. त्यामध्ये मदन बामणे, नेताजी जाधव आणि रणजीत चव्हाण पाटील यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समजते. त्यामुळे अध्यक्षपदाची धुरा नेमकी कोणाच्या खांद्यावर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचबरोबर अध्यक्षपदाची निवड करताना शहर समितीचे पुनर्बांधणी करून संघटना अधिक मजबूत करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. आता याबाबत समितीचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − thirteen =

error: Content is protected !!