बेळगाव : मराठी भाषेतील उत्कृष्ट साहित्य कन्नड भाषेत उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण अभियान बहुवचन प्रकाशन हाती घेतले असून, हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत ज्येष्ठ नाट्यकार हुलगप्पा कट्टिमनी यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे कन्नड भाषिकांना इतर भाषांतील दर्जेदार साहित्य वाचण्याची संधी मिळत असून, हे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
बेळगावचे पत्रकार व अनुवादक अशोक चिक्कपरप्पा यांनी मराठीतून कन्नडमध्ये अनुवादित केलेल्या ‘तो एक राजहंस’सह इतर दोन नाटकांचा लोकार्पण सोहळा रविवारी बंगळूर येथील सुचित्रा सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारवाड रंगायन चे माजी संचालक हुलगप्पा कट्टीमनी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपा गणेश यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर डी. एस. चौगुले, विवेक शानबाग , डॉ हेमा पट्टनशेट्टी, हुलगप्पा कट्टीमनी, अशोक चिक्कपरप्पा आणि विशाल महाले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘तो राजहंस एक’, ‘नेरळुगळू’ (सावळ्या) आणि ‘अतंत्र’ (अधांतर) या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी डॉ. हेमा पट्टणशेट्टी यांनी अनुवादित नाटकांच्या आशयाची खोली आणि भाषांतरातील सौंदर्य यावर भाष्य केले. प्रमुख पाहुणे डी. एस. चौगुले यांनी भाषांतर प्रक्रियेत येणारी तांत्रिक आव्हाने आणि आवश्यक शिस्त याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विशेष रंगत ‘राजहंस’ नाटकाच्या वाचनामुळे प्राप्त झाली. ज्येष्ठ कलाकार कीर्ती भानू आणि प्राची रविचंद्र यांनी सादर केलेल्या प्रभावी वाचनाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘अतंत्र’ नाटकाचे अनुवादक विशाल महाले यांनी मेलुकोटे येथील फेलोशिपच्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या मनोगतात अशोक चिक्कपरप्पा यांनी फेलोशिपसाठी अर्ज करताना आलेल्या अडचणींचा उल्लेख केला. बेळगावमधील मित्र वसंत धामणेकर आणि नवसाहित्य बुक स्टॉलच्या जवळकर बंधूंनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्यामुळेच ही संधी मिळाल्याचे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले.
आईच्या हस्ते पहिली प्रत स्वीकारत अनोखा आदर्श
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते अशोक चिक्कपरप्पा यांनी जपलेला अनोखा आदर्श. सहसा मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाची पहिली प्रत स्वीकारली जाते; मात्र त्यांनी आपल्या ८७ वर्षीय मातोश्री तंगेव्वा गुंडप्पा चिक्कपरप्पा यांच्या हस्ते पहिली प्रत स्वीकारण्याची विनंती केली. त्यानुसार आईच्या हस्ते पुस्तक स्वीकारताना उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘मातृदिन’पूर्वीच आईला दिलेला हा मान सर्वांच्या भावनांना स्पर्शून गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमधुरा यांनी केले, तर विवेक शानभाग यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कन्नड साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
