बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने १९ एप्रिलला शिवजयंती; २१ एप्रिलला भव्य चित्ररथ मिरवणूक

बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने १९ एप्रिलला शिवजयंती; २१ एप्रिलला भव्य चित्ररथ मिरवणूक

बेळगाव : शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. वैशाख शुद्ध द्वितीयेला, म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या या शिवजयंतीनिमित्त रविवार दि. १९ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे.

मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यांवरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता नरगुंदकर भावे चौक येथील मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व आरती होईल. पुढे सकाळी १० वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानातील मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नरगुंदकर भावे चौक येथे मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करून अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत कपिलेश्वर मंदिर येथे समारोप होणार आहे.

यावर्षी मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून १०७ वी शिवजयंती साजरी होत असून, सर्व शिवभक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्यवाह मदन बामणे, शिवराज पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 14 =

error: Content is protected !!