बेळगाव : प्रतिनिधी
बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे चौक येथील जत्तीमठ येथे नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते.
या बैठकीत यंदाचा उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशा पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात आला. विविध मंडळांच्या सूचनांवर चर्चा करून काही महत्त्वाचे नियम ठरविण्यात आले.
अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले की, शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श स्वरूप देण्यासाठी आणि मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच संपवण्यावर विशेष भर देण्यात येणार असून, कोणताही वाद टाळण्यासाठी सर्वांनी संयम आणि शिस्त पाळावी, असे आवाहन करण्यात आले.
यंदापासून उत्कृष्ट चित्ररथ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, प्रसाद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार असून भव्य समारंभात बक्षीस वितरण केले जाणार आहे.
प्रत्येक मंडळाने आपला चित्ररथ वेळेत मिरवणूक मार्गावर आणावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि इतर मंडळांचा सन्मान राखत कोणताही संघर्ष टाळावा, असेही आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून मदत कक्ष उभारण्यात येणार असून मंडळांनी आपल्या अडचणींचे निराकरण त्यामार्फत करून घ्यावे, असे सांगण्यात आले.
बेळगावची शिवजयंती ही देशभरात विशेष परंपरेसाठी ओळखली जाते. प्रत्येक चित्ररथातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन सादर केले जाते. त्यामुळे सर्व मंडळांनी परस्पर सहकार्याने आणि सन्मानाने हा उत्सव यशस्वी करावा, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.
या बैठकीस अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, गुणवंत पाटील, प्रसाद मोरे, रंजीत हवळणाचे, चेतन किल्लेकर, शिवम गंधवाले, अरुण पाटील, चंद्रकांत माळी, अनंत बामणे, बसवंत मुतकेकर यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
