📍 खानापूर (बेळगाव):
खानापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून वाद शांत करण्यासाठी गेलेल्या युवकावरच चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत आदर्श कोळेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषांक पुजारी यांनी श्रेयस देसाई यांना चाकूने ठार मारण्याची धमकी दिली होती. या वादात मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्यासाठी दोघांचा मित्र असलेले आदर्श कोळेकर पुढे आले. मात्र, वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच व्रशांक पुजारी यांनी आदर्श यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात आदर्श कोळेकर यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या मानेवर खोल जखमा असून सुमारे १२ ते १५ टाके घालावे लागले आहेत. पाठीवर सुमारे ३५ टाके घालावे लागले असून स्नायूंनाही इजा झाली आहे. तसेच हातावर ७ टाके घालावे लागले आहेत. जखमांची तीव्रता लक्षात घेता त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या त्यांच्यावर वेणुग्राम हॉस्पिटलयेथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पहाटे आरोपी ऋषांक पुजारी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयीन आदेशानुसार त्याची हिंडलगा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.
या घटनेवेळी सुमारे सहा प्रत्यक्ष साक्षीदार उपस्थित होते. आदर्श कोळेकर यांनी केवळ वाद शांत करण्यासाठी हस्तक्षेप केला होता, मात्र त्यांच्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#Belgav #BedhadakBelgav
