बेळगावात ‘नाट्यदिंडी २०२६-२७’ची दमदार घोषणा; वर्षभर सहा दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी

बेळगावात ‘नाट्यदिंडी २०२६-२७’ची दमदार घोषणा; वर्षभर सहा दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी

बेळगाव : अखिल भारतीय नाट्य परिषद , बेळगाव शाखेतर्फे आयोजित ‘नाट्यदिंडी’ या उपक्रमाने पहिल्याच वर्षी नाट्यरसिकांची मनं जिंकली असून आता हा उपक्रम दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. ‘नाट्यदिंडी २०२६-२७’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यंदाही रसिकांसाठी वर्षभर सहा उत्कृष्ट नाट्यप्रयोगांची मेजवानी सादर केली जाणार आहे.

गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या नाट्यदिंडीला नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या उपक्रमांतर्गत सादर झालेल्या नाटकांचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतल्यामुळेच यंदाच्या वर्षासाठीही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

या योजनेअंतर्गत एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत एकूण सहा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये चार नावाजलेली व्यावसायिक नाटके आणि दोन प्रायोगिक नाटके किंवा एखादा दर्जेदार रंगमंचीय कार्यक्रम सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या नाटकांची माहिती फक्त नाट्यदिंडीच्या सभासदांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारेच देण्यात येणार असून इतरत्र कोणतीही जाहिरात केली जाणार नाही.

नाट्यदिंडीसाठी वार्षिक पासेसची विक्री सुरू झाली आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी विविध श्रेणींमध्ये पासेसचे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रीमियम सोफा पास १३,००० रुपये, A व B रांग १०,५०० रुपये, C, D, E रांग ७,५०० रुपये, F व G रांग ४,५०० रुपये, H व I रांग ३,५०० रुपये तर J, K, L रांग २,५०० रुपये असे दर जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी २,५००, ३,५०० आणि ४,५०० रुपयांच्या सर्व सीट्स आधीच पूर्णपणे बुक झाल्याने उर्वरित उच्च श्रेणीतील पासेससाठी नाट्यप्रेमींमध्ये चढाओढ सुरू आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या सभासदांना वर्षभरासाठी एक पास/कार्ड देण्यात येणार असून त्या कार्डवर नमूद केलेल्या रांगांमध्ये ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर बसण्याची सुविधा असेल. प्रत्येक नाट्यप्रयोगाच्या आधी मुख्य प्रवेशद्वारावर पास दाखवणे बंधनकारक असेल. प्रेक्षकांना कोणतेही निश्चित सीट क्रमांक दिले जाणार नाहीत.

नाट्यप्रयोगांचे आयोजन कन्नड भवन, शेख होमिओपथी कॉलेजसमोर, बेळगाव येथे करण्यात येणार असून प्रत्येक कार्यक्रम सायंकाळी नेमके सहा वाजता सुरू होईल. तसेच प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

नाट्यदिंडीच्या सभासदांसाठी ३०५ सदस्यांचा स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला जाणार असून प्रत्येक नाटकाची माहिती सादरीकरणाच्या १० ते १५ दिवस आधी देण्यात येईल. एखाद्या सदस्याला नाटकाला उपस्थित राहता आले नाही, तर तो आपला पास आपल्या स्नेही किंवा नातेवाईकाला देऊ शकतो.

महत्त्वाची बाब म्हणजे, या योजनेसाठी भरलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही किंवा पुढील वर्षासाठी हस्तांतरित केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाट्यप्रेमींनी ही संधी गमावू नये आणि लवकरात लवकर आपले पास निश्चित करून वर्षभर चालणाऱ्या या नाट्यउत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद च्या कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 12 =

error: Content is protected !!