बेळगाव : शहर सायबर गुन्हे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 15 कोटी 45 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा उलगडा केला आहे. या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2026 रोजी सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 25/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 319(2), 111(2) तसेच आयटी अॅक्टच्या 66(C) व 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी अजित गोपाळकृष्ण सराफ (रा. अगरकर रोड, टिळकवाडी, बेळगाव) यांना अज्ञात व्यक्तींनी फोन करून स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यांच्या नावावर दोन सिमकार्ड आणि बँक खाते गैरप्रकारात वापरले जात असल्याची भीती दाखवून चौकशीच्या नावाखाली त्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.
आरोपींनी “तुमचे खाते गंभीर गुन्ह्यात अडकले असून तपासासाठी सहकार्य करा, अन्यथा अटक करण्यात येईल” अशी धमकी देत फिर्यादीकडून वेळोवेळी मोठ्या रकमा विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडले. 7 फेब्रुवारी 2026 ते 9 मार्च 2026 या कालावधीत एकूण 15,45,00,000 रुपये आरटीजीएसद्वारे विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पैशांचा मागोवा घेतला असता काही रक्कम आरोपींच्या खात्यांमध्ये जमा झाल्याचे आढळून आले. यामध्ये आरोपी वेंकटेश शरथ नायक (रा. गच्चीबोळी हॉस्टेल, हैदराबाद) व श्रीपाद नायक (रा. शिवदुर्ग नगर, चंचलगुडा, हैदराबाद) यांच्या संयुक्त बँक खात्यात 2 कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले.
सायबर पोलिसांच्या पथकाने हैदराबाद येथे धाड टाकून 6 एप्रिल 2026 रोजी आरोपींना अटक केली. त्यानंतर 7 एप्रिल रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त बी. एस. मंटूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी, पीएसआय सुमन पवार तसेच कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
