खानापूरच्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडे पॉंडेचरीची अतिरिक्त जबाबदारी

खानापूरच्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडे पॉंडेचरीची अतिरिक्त जबाबदारी

एआयसीसीकडून निवडणूकपूर्व महत्त्वाची घोषणा; ब्लॉक काँग्रेसतर्फे अभिनंदन

खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर यांच्याकडे गोव्यापाठोपाठ आता पॉंडेचरी (पुडुचेरी)ची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तामिळनाडू व पॉंडेचरी येथे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला असून, याबाबतची माहिती एआयसीसीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पक्षश्रेष्ठींचा पुन्हा विश्वास

काँग्रेस पक्षात एआयसीसी सचिव म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निंबाळकर यांच्यावर यापूर्वीही विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या त्यांच्या कार्यक्षेत्रात तीन केंद्रशासित प्रदेश व एका राज्याचा समावेश असून, यापूर्वी केरळ, उत्तराखंड व उत्तरप्रदेश येथील संघटन सृजनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. संघटन कौशल्य व निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.

संघटन बळकटीकरणावर भर

पक्ष संघटनेचे काम प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे करण्याचा ध्यास त्यांनी घेतला असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पॉंडेचरीत संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहणार आहे. कार्यकर्त्यांना सक्रिय करून निवडणूक तयारीस गती देण्याचे संकेत मिळत आहेत.

खानापूरकडेही लवकरच लक्ष

दरम्यान, वाढत्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमुळे खानापूरकडे थोडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा काही कार्यकर्त्यांतून होत असली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या झेडपी, टीपी व पंचायत निवडणुका डॉ. निंबाळकर यांच्या नेतृत्वात तालुक्यात जोरदारपणे लढविल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

ब्लॉक काँग्रेसतर्फे अभिनंदन

नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 💐

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

error: Content is protected !!